'गणेशोत्सव ' हा खरं तर अलीकडचा शब्द . लहानपणी हे १० दिवस म्हणजे 'गणपती ' च फक्त .
त्या दहा दिवसांचे वेध खूप आधीपासून लागायचे . चतुर्थीच्या आधीचा एक आठवडा 'मेकिंग ऑफ गणपती ' चा असायचा . आई बाबांसोबत पायी पायी फिरायला निघायचो . बोरभाट लेन मधून मुगभाटात . तिथे आईच्या मैत्रिणीच्या - शोभा मावशीच्या - कुटुंबाचा गणपती बनवण्याचा कारखाना होता . तिथे उभे राहून गणपतीची विविध रूपं साकारताना पाहणं हा एक अवर्णनीय अनुभव असायचा. मुगभाटात असे बरेच कारखाने होते. सगळीकडे थोडा थोडा वेळ थांबून मग आमची यात्रा जायची जितेकर वाडीकडे . इथे मोठ्या मुर्ती बनवत असत . आज गिरगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला 'निकदवरी लेन ' चा गणपती तर अगदी जवळचा . तिथल्या सारस्वत बँकेला लागून त्याचा मंडप असायचा . आणि बँकेच्या वरती पहिल्या मजल्यावर आमचा नृत्याचा क्लास . मग रोज आम्ही हळूच मंडपाची कमान उचलून मूर्तीचं काम कुठवर आलंय ते पाहायचो . जगातल्या कुठल्याही प्रोजेक्ट सारखं त्यांचंही काम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत चालूच असायचं .
मग गणपतीच्या आगमनाची चाहूल लागायची. घराखालच्या भांड्यांच्या दुकानात तबक , पळी -पंचपात्र , समया आता पुढचं स्थान पटकवायच्या . आणि त्यांसोबत पितळेच्या झान्जा ही .
घरी गणपती बसत नसे , पण आजुबाजुच्या कडचे सर्व गणपती आपलेच वाटत . पेठे बिल्डिंग मधल्या शिर्के काकांच्या घरचा दीड दिवसाचा गणपती जणू आमचाच . मुर्ती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही तिकडेच असायचो. सर्वात छान वाटायचं ते संध्याकाळच्या आरतीच्या वेळी . 'सुखकर्ता दुःखहर्ता ' ते 'ओम यज्ञेन ...' ह्या मंत्र पुष्पांजली पर्यंत सर्व आरत्या कधीही पाठांतर न करता , पुस्तक न पाहता आपसूक म्हणता येतात त्या याच दिवसांमुळे .
सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी आमची फिरस्ती असायची मानाचे गणपती पाहायला . निकदवरी लेन , मुगभाट , सूर्य महाल , खाडीलकर रोड भाजी गल्ली आणि के. ना. म्हणजे केशवजी नाईक वाडी या ठिकाणी आवर्जून जाणं व्हायचं . आणि बाकीही वाटेत असणाऱ्या सर्व वाड्यांचे . खेतवाडीच्या सर्व गल्यांचे फारच सुंदर असायचे , मूर्ती आणि देखावे दोन्ही .
नंतर यायच्या गौराई . कोळीवाडीतल्या 'कोळ्यांची गौर ' पाहायला न चुकता जायचो . जरीच्या साडीत आणि गळाभर दागिन्यांनी सजलेली प्रसन्न गौराई पाहताना हात आपोआप जोडले जायचे.
या सर्व धामधुमीत दहा दिवस कसे भुर्र्कन उडायचे ते कळायचंच नाही , आणि मग यायची अनंत चतुर्दशी .
दीड दिवसाच्या विसर्जनाला आम्ही चौपाटीवर जायचो . बाप्पाची अखेरची आरती करताना खरंच आवंढा यायचा आणि मनापासून म्हणायचो - 'पुढच्या वर्षी लवकर या '.
अनंत चतुर्दशी ला मात्र गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी त्यामुळे क्वचितच जाणं व्हायचं . पण आमचं घर गिरगावच्या मुख्य रस्त्यावर असल्याने जवळ जवळ सर्वच विसर्जन मिरवणुका तिथूनच जायच्या .
संध्याकाळी चार वाजल्या पासूनच आमचा मुक्काम खालीच . रामजीचं plywood च दुकान त्या दिवशी बंद असायचं . त्यामुळे तिथे जागा धरून बसलो की सर्व गणपती आणि मिरवणुका पाहायला मिळायच्या .
ढोल ताश्यांचा इतका आवाज असायचा की ओरडून बोलल्याशिवाय बाजुच्याच बोलणंही ऐकायला यायचं नाही .
लांब लांबचे गणपती पहायला मिळायचे . लालबागचा राजा पहायला मात्र ऑपेरा हाऊसलाच जात असू . सकाळी लालबाग वरून निघालेली राजाची मिरवणूक ऑपेरा हाऊस जवळ यायला रात्रीचे ११-१२ वाजायचे. तो पाहून परत घरी येईपर्यंत झोप अगदी अनावर व्हायची . ढोल - लेझीम च्या गदारोळात , बाप्पाची विविध रूपं आठवत निद्रादेवी कधी प्रसन्न व्हायची ते कळायचंच नाही.