किंडल बद्दल आधी मी इंग्लिश मध्ये एक पोस्ट लिहिली होती. पण नंतर असं वाटलं कि लेख मराठीत लिहिला तर जास्त लोकांपर्यंत पोचेल , म्हणून हा खटाटोप .
किंडल संदर्भात नेहमी मनात येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा माझा प्रयत्न -
* किंडल म्हणजे नक्की काय?
किंडल हे electronic पुस्तकं वाचण्यासाठी अमेझॉन कंपनी ने बनवलेलं एक खास device आहे, जे साधारण एका टॅब सारखं दिसतं . किंडल च्या वापरातून तुम्ही पुस्तक / मासिक / वर्तमानपत्र वाचू , शोधू, खरेदी करू , download करू शकता .
किंडल मध्ये खास तंत्र (ई - शाई ) वापरलय जे आपल्या स्मार्ट फोन / टॅब पेक्षा वेगळं आहे. त्यामुळे दोन फायदे होतात , एक कि किंडल ची बॅटरी खूप जास्त चालते (कित्येक आठवडे ) आणि दुसरं म्हणजे ह्या तंत्रा मुळे डोळ्यांना त्रास होत नाही .
* किंडल का खरेदी करावं आणि वापरावं ?
जर तुम्ही हाडाचे वाचक असाल तर तुमच्या साठी किंडल अगदी योग्य आहे. आता 'हाडाचे वाचक ' म्हणजे काय तर - जर तुम्ही रोज काही ना काही, साधारण एक तास भर , वाचन करता .
पण जर तुम्ही क्वचित वाचता - जस कि समजा कुणी काही सूचित केलं किंवा एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूप ऐकलं तरच तुम्ही वाचन करता - तर किंडल चा पूर्ण फायदा घेऊ शकणार नाही .
* कागदी पुस्तकांच्या संग्रहा पेक्षा किंडल चा काय फायदा आहे?
किंडल वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जवळ जवळ अगणित पुस्तक तुम्ही ह्यात ठेऊ शकता आणि सोबत कुठेही नेऊ शकता .
समजा तुम्ही घरा बाहेर आहात , प्रवास करताय, विमानतळ / हॉटेल / डॉक्टर अश्या ठिकाणी तुमचा नंबर यायची वाट पाहताय, किंवा तुम्हाला आजुबाजूला अंधार असतानाही वाचायचंय , मग अश्या वेळी कागदी पुस्तकांपेक्षा किंडल चा फायदा असतो.
सध्या जे किंडल मिळतात , त्यांच्यात कमीत कमी ४ GB मेमरी असतेच. म्हणजे मोठ्यात मोठी पुस्तक ज्यांची फाईल साईझ १ MB असते , अशी करोडो पुस्तक ह्यात सामावू शकतात आणि हि सारी पुस्तकं तुम्ही एकत्र कुठेही घेऊन जाऊ शकता.
मलाही कागदी पुस्तकं आवडतात , पण मुंबईतल्या घरांचं आकारमान पाहता , करोडो पुस्तकांसाठी राखीव जागा ठेवणं शक्य नाही . आणि नुसतं साठवणूक नाही तर त्यांची निगराणी राखणं , धुळीपासून संरक्षण , कव्हर बदलणं हे सुद्धा कठीण होत.
* किंडल घेण्यापेक्षा मोबाईल वर फ्री किंडल अँप वापरलं तर?
जर तुम्ही अनियमित वाचक असाल किंवा मोबाईल च्या प्रकाशाने तुम्हाला त्रास होत नाही , तर कदाचित किंडल device विकत घेण्यापेक्षा किंडल अँप सोयीस्कर ठरेल .
अँप वापरण्याचे महत्वाचे फायदे म्हणजे - १) अँप एकदम फुकट आहे . अर्थात पुस्तकं विकत घ्यावी लागतील ('फक्त फ्री पुस्तकं वाचायची' असं तुम्ही ठरवू शकता 😊 ), २) अँप तुमच्या फोन मध्ये असतं जो तुम्ही तस पण कायम सोबत बाळगता .
किंडल हे छोटं आणि हलकं device आहे पण तरीही एक जादा गोष्ट चार्ज करणं आणि सोबत बाळगणं अपरिहार्य होत .
अँप चा सर्वात मोठा तोटा म्हणजे , फोन चा प्रकाश. फोन आणि किंडल च प्रकाश तंत्र वेगळं आहे . कितीही नाही म्हटलं तरी फोन च्या प्रकाशाचा नकळत डोळ्यांवर परिणाम होतोच होतो.
आजकाल तसही आपण सर्वच फोन पाहण्यात गरजेपेक्षा जास्त वेळ घालवतो , मग निदान वाचन करताना तरी अतिरिक्त त्रास नको डोळ्यांना . आणि जर तुम्ही पूर्ण सूर्य प्रकाशात वाचताय , जस की गच्ची वर / बीच वर , तर फोन वर पुस्तक वाचन कठीण होत.
किंडल device कि किंडल अँप - ह्यात निवड करताना , आधी किंडल अँप वापरून पहा. १-२ पुस्तक किंवा २-३ आठवडे वाचून पहा कि वाचन अनुभव कसा आहे ते . मग किंडल घायचा कि नाही हे तुम्ही ठरवू शकता
* किंडल वापरताना वायफाय किंवा इंटरनेट लागतं का ?
नाही . एकदा का पुस्तकं किंडल मध्ये संग्रहित झाली , जस कि आपल्या फोन मध्ये आपण फोटो संग्रहित करतो, कि पुस्तकं उघडायला आणि वाचायला इंटरनेट /वायफाय ची आवश्यकता नाही . नुसतं वाचन नाही तर तुम्ही अधोरेखित केलेले परिच्छेद , लिहिलेल्या टिप्पणी हे सर्वही उपलब्ध राहातं .
* किंडल चा डोळ्यांवर परिणाम होतो का ?
इ-शाई आणि LED प्रकाश ह्या तंत्रामुळे किंडल चा प्रकाश प्रचंड सौम्य असतो, जो डोळ्यांसाठी खूपच कमी त्रासदायक आहे. किंडल ओऍसिस मॉडेल मध्ये तर स्व-नियंत्रित प्रकाश योजना आहे ज्यामुळे सभोवतालच्या प्रकाश तीव्रते नुसार किंडल चा प्रकाश आपोआप बदलतो .
* मला रात्री / झोपण्या आधी वाचायला आवडतं , मग किंडल उपयोगी आहे का?
खुप लोकांना झोपण्या आधी थोडं वाचन करायला आवडतं . कागदी पुस्तक वाचायचं असेल तर त्यासाठी दिवा चालू ठेवणं आवश्यक होतं जे तुमच्या जोडीदाराला त्रासदायक वाटू शकतं . किंडल चा प्रकाश अतिशय सौम्य असतो आणि त्यामुळे आपण किंडल वाचनाचा दुसर्यांना त्रास होत नाही .
* आता पर्यंत सर्व छानच , पण पैसे किती पडतात ?
किंडल ची खूप (३ प्राथमिक) मॉडेल बाजारात मिळतात, ज्यांची किंमत साधारण ८००० ते २२,००० रुपये ह्या रेंज मध्ये आहे .
सर्वात उच्च प्रतीच्या मॉडेल मध्ये सुविधा हि चांगल्या आहेत जस कि ४G , म्हणजे तुम्ही फोन सारखं डेटा सिम कार्ड त्यात वापरू शकता .
जर किंमत आणि सुविधा ह्यांचा ताळमेळ घालायचा असेल तर मधलं मॉडेल (उदा . किंडल पेपर व्हाईट ) योग्य ठरेल. ह्या मॉडेल मध्ये सर्वसाधारण वापरात येणाऱ्या साऱ्या सुविधा आहेत आणि किंमतही योग्य आहे . (साधारण १२००० ते १३००० रुपये )
* आणि पुस्तकांच्या किमतीचं काय? त्यांचा किती खर्च येतो?
पुस्तकांच्या किमती मध्ये खूपच विभिन्नता असते. अमेझॉन वर लाखो पुस्तकं फुकट हि उपलब्ध आहेत . पण सुप्रसिद्ध लेखकांची किंवा प्रसिद्ध कादंबऱ्या , मुलांची पुस्तकं , स्व-मदत (सेल्फ-हेल्प ) अशी पुस्तकं साधारण ० ते ५०० रुपयात मिळतात.
चांगली गोष्ट म्हणजे , दररोज अमेझॉन वर वेगवेगळी पुस्तकं , अतिशय नाम मात्र किमतीत उपलब्ध होतात.
अमेझॉन च्या साईट वर तुम्हाला 'Deal of the day', 'Monthly deal', 'Lightening deal', 'Limited time deal' असे खूप पर्याय दिसतील .
जर तुम्ही उत्सुक वाचक आणि त्याच सोबत संयमी असाल तर तुम्हाला हवी ती पुस्तकं खिशाला परवडणाऱ्या किमतीत कधी ना कधी नक्कीच मिळतात .
माझा स्वतःचा अनुभव - मी गेली ६ वर्ष किंडल नियमित वापरतेय . मी जी काही पुस्तकं विकत घेतलीयत (इंग्लिश आणि मराठी), त्यातली बहुतेक मी प्रत्येकी १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घेतली आहेत. आणि माझ्याकडे चांगल्या पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह आहे ज्यांची कागदी पुस्तकांची किंमत प्रत्येकी २५० ते ५०० रुपये आहेत .
बहुतांशी पुस्तकांच्या किंडल कॉपी ची किंमत हि कागदी पुस्तकांच्या किमतीपेक्षा खूपच कमी असते,
* पुस्तक विकत घेतल्यावर ते वेगवेगळ्या उपकरणांवर वापरता /वाचता येत का?
हो . तुम्ही तुमचा किंडल संग्रह ६ वेगवेगळ्या उपकरणांवर वापरू शकता, जस कि वेगवेगळे किंडल device , तुमचा कॉम्पुटर , फोन किंवा टॅब (किंडल अँप द्वारे )
* किंडल बिघडतो का? बिघडला तर दुरुस्ती साठी काय करायचं ?
किंडल ची दुरुस्ती केंद्र भारतात almost नाहीच आहेत . किंडल विकत घेताना १ वर्षाची warranty असते . पण फोन च्या तुलनेत किंडल तसं खूपच कमी क्लिष्ट device आहे त्यामुळे सहजासहजी ते बिघडत नाही . तुम्ही किंडल सोबत जर चांगल्या प्रतीचं कव्हर घेतलं तर रोजच्या वापरात जी घाल-पाड होते त्यापासून नक्कीच संरक्षण होत .
माझं किंडल मी गेली ६ वर्ष वापरतेय आणि अजून एकदाही त्रास दिलेला नाही.
त्यातूनही जर किंडल बिघडलंच, तरी तुमचा विकत घेतलेला पुस्तक संग्रह अबाधित राहतो. तुमची पुस्तकं अमेझॉन खात्याशी संलंग्न असल्याने नवीन device वर ती तात्काळ उपलब्ध होतात आणि नव्याने खरेदी करावी लागत नाही.
* किंडल चे अजून काय फायदे आहेत?
किंडल 'Goodreads' ह्या प्रचलित साईट शी जोडू शकता . ह्यामध्ये in-built शब्दकोश आहे जो जुनी इंग्लिश पुस्तकं वाचताना खूप कामात येतो .
* किंडल सारखे अजून काही वाचन उपकरणे आहेत का?
हो. बाजारात किंडल व्यतिरिक्त देखील पर्याय आहेत जस कि Kobo Aura H2O, Kobo Clara HD, Nook.
पण जसं बाकरवडी चितळ्यांची , तसंच इ -वाचन उपकरण म्हणजे किंडल असं समीकरण आहे 😄
* मग किंडल विकत घेणं ही फायदेशीर गुंतवणूक आहे का?
ह्याच उत्तर तुमच्या बजेट वर आणि तुम्ही किती वाचता यावर अवलंबून आहे .
मी साधारण १०००० मध्ये किंडल घेतलं होत आणि ती माझी सर्वात चांगली गुंतवणूक ठरलीय.
मग आता एवढा मोठा लेख वाचलाच आहे तर एखादं आवडीचं पुस्तकही वाचून पहा .
" दिसामाजी काहीतरी वाचीत जावे " असं म्हटलंच आहे ना !
!!!happy reading !!!