Thursday, March 1, 2018

संगम

कधी पाहिला नाहीये मी नदी आणि सागराचा संगम, पण जेव्हा पाहीन तेव्हा काही मनातले प्रश्न विचारीन नदीला ,

- कसं जमतं ग तुला असं झोकून देणं ?
- भेटतेस  तू समुद्राला आणि संपतं  तुझं स्वतंत्र अस्तित्व . त्या क्षणापर्यंत तुला स्वतःच नाव असतं , तुझ्या पाण्याला तुझी अशी एक चव असते . कसं जमवतेस तू असं 'मी ' पण संपवायला ?
- वाटते का ग कधी भिती तुला सागराची , त्याच्या रौद्रावताराची?  खवळलेला असतो जेव्हा तो, त्या वेळी काय करतेस तू? आवरतेस स्वतःला की तूही जोमाने सामावतेस त्यात?
- माहित असतं ना तुला कि तुला त्याच्या खाऱ्या पाण्यात मिसळून जायचंय ? की तुला असते आशा , कदाचित तुझ्या गोडव्याने कमी होईल खारटपणा ?
- गावा गावातून , दरी खोऱ्यातून  वाहतेस तू. वेगवेगळी रूपं तुझी , कधी अथांग प्रवाह तर कधी अवखळ धारा . काय रूप असतं तुझं त्या संगम क्षणी ? आतुरलेली नवयौवना की संसार त्यागलेली शांत समाधानी साध्वी ?
- येतात का कधी अश्रू तुझ्या डोळ्यांत , आठवून आपलं उगमस्थान - मागे राहिलेलं आणि आता कायमचं दुरावलेलं ?
- माहित असतं तुला की तुझ्यासारख्याच अनेक जणी सामावणार आहेत त्या सागरात , आणि तुझा एकटीचा नाहीये तो ?
- मन भांबावत नाही तुझं की कुठे नेईल हा संगम तुला ? की असते खात्री तुला त्याच्या अथांग आवाक्याची ?
- कधी विचारतेस का तू मजेत , वर्षानुवर्ष मी माझा गोडवा ओततेय तुझ्यात , हो की तुही गोड एकदा तरी माझ्यासारखा ?
- उठतं का मनी काहूर तुझ्या कधी , 'नको येऊस ' म्हणाला कधी तर काय करायचं ? की भरवसा असतो तुला मनापासून तो असं कधीच म्हणणार नाही याचा ?
- ठाऊक असतं तुला की एकदा का त्याच्या ओढीने प्रवासाला निघालीस की मार्ग नाही परतीचा ?
- कसं जमतं तुला सतत वाहत राहणं , हे माहित असूनही की अखेर त्याच्या खाऱ्या पसाऱ्यात लुप्त व्हायचंय पण तरीही त्या संगम क्षणापर्यंत स्वतः गोडंच राहायचं ?

1 comment:

  1. अप्रतिम लिहिलं आहेस!

    ReplyDelete