Monday, April 26, 2021

वाढदिवस आणि बाबा

काल रात्री १२ वाजता लेकाने गळ्यात पडून Happy Birthday विश केलं आणि खर्र्कन जाणवलं की ह्या वर्षी मला विश करायला बाबा नाहीत . 

माझा वाढदिवस म्हणजे अगदी खास त्यांच्या साठी . एकही वर्ष असं गेलं नाही कि मला बाबांनी विश  करून काही भेट दिली नसेल 

मी शाळेत असताना वाढदिवस जसजसा जवळ येई तसे बाबा गिरगावातल्या खास खास कपड्यांच्या दुकानाच्या फेऱ्या मारायचे . आणि शॉर्टलिस्ट करायचे की ह्या वर्षी मला काय घेणार ते 

अगदी लहानपणी च नाही आठवत पण कळत्या वयातले त्यांनी घेतलेले सगळे ड्रेस मला अजूनही आठवतात . त्यांची पसंद मला आवडली नाही असही  कधी झालं नाही . 

एका वर्षी 'गोट्या ' नावाची मालिका खुप प्रसिद्ध झाली होती आणि आम्ही सर्व पाहायचो TV वर . त्या वर्षी त्यांनी मला गोट्या कादंबरी चा पूर्ण सेटच आणला होता . 

एकदा मला प्रार्थना समाज च्या एका बूकडेपो मध्ये घेऊन गेले आणि म्हणाले तुला हवी ती पुस्तक घे , मी गोंधळून १-२ छोटी छोटी पुस्तकं घेतली , मग त्यांनीच अजून ४-५ सिलेक्ट केली आणि आम्ही रमत गमत (मी उड्या मारत ) घरी आलो . 

माझं लग्न झाल्यावर देखील हा सिलसिला चालूच राहिला . एप्रिल च्या सुरवाती पासूनच ते आई ला विचारायला लागायचे काही आणलास का नाही अजून तिच्या साठी ?

जेव्हा ते स्वतः बाहेर जायचे तेव्हा काही नाही तेर ग्रांट रोड च्या मेरवान चे मावा केक तर आवर्जून आणायचे . २४ ला सकाळी सकाळी फोन यायचा शुभेच्छा द्यायला . 

गेल्या एक-दीड वर्षात त्यांचा तारखा बाबत जरा गोंधळ व्हायचा . कुठला महिना चालू आहे हे पटकन उमगत नसे. मी गेल्या ७ फेब ला त्यांना भेटायला गेले होते, तेव्हा निघताना त्यांनी विचारलं कि २४ तारखेला येशील ना तू?  मला पटकन समजलं नाही असं का विचारतायत , मी म्हटलं काय आहे बाबा ह्या २४ ला ? तर त्यांच्या खास शैलीत म्हणाले "अरे येडा , तुझा वाढदिवस नाही का ? " इतकी महत्वाची होती २४ तारीख त्यांच्या साठी . 

आता बाबांना जाऊन २ महिने झाले , ह्याच नाही तर ह्या पुढच्या प्रत्येक वाढदिवसाला मला तुमची उणीव भासणार आहे बाबा . तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम पाठीशी राहूद्या . 


1 comment:

  1. :).... तुझा birthday खूप special असायचा त्यांच्यासाठी...

    ReplyDelete