Showing posts with label girgaon. Show all posts
Showing posts with label girgaon. Show all posts

Monday, May 8, 2023

आम्ही मुंबईकर


आम्ही मुंबईकर कारण  - 

* 'अ ' ठिकाणाहून  'ब' ठिकाणाचं अंतर किती आहे हे आम्ही मिनिटं -तासात मोजतो , किलो मीटर मध्ये नाही 

* ५-१७, ८-४२, ७-२४ ह्या वेळा कशाच्या आहेत हे कळायला आम्हाला अजून काही स्पष्टीकरणाची गरज नाही 

* वडा - पाव ही आमची अत्यंत आवडती डीश आहे आणि तो नाश्ता , दुपारचं जेवण किंवा 'असच काहीतरी ' ह्या सर्व कारणांसाठी खाऊ शकतो 

* संकट काळी आम्हाला सिद्धी विनायक , हाजी अली  आणि माउंट मेरी ची एकत्र आठवण येते 

* मुंबई च्या वरचे सगळे ;नॉर्थ इंडियन ' आणि खालचे सर्व  'मद्रासी ' हे आमचं अर्वाचीन मत आहे 

* जगातली सर्वात शांत, आत्म परीक्षण करायची  जागा म्हणजे मरीन ड्राईव्ह चा गजबजलेला कट्टा 

* मुंबई च्या स्वतःच्या अशा खास भाषेत - ज्यात बॉस , घंटा , निकल ले , जुगाड, मांडवली  असे विविध अद्वितीय शब्द आहेत - आम्ही पारंगत आहोत 

* आयुष्यातील नकार पचवायची दैवी शक्ती  आणि मनोबल वृद्धिंगत करण्यात इथल्या रिक्षा वाल्यांचा मोठा हातभार आहे 

* जगात कुठेही असो , 'गणपती बाप्पा ' ची आरोळी कानावर पडली की लगेच  'मोरया ' असा जयघोष मनात उठतोच 

* एकदा तरी 'ताज ' मध्ये जेवायला नाही तर किमान चहा प्यायला  तरी जायचं हे आमचं बालपणाचं स्वप्न असतंच 



Monday, September 10, 2018

गणपती बाप्पा मोरया

'गणेशोत्सव ' हा खरं तर अलीकडचा शब्द . लहानपणी हे १० दिवस म्हणजे 'गणपती ' च फक्त .
त्या दहा दिवसांचे वेध खूप आधीपासून लागायचे . चतुर्थीच्या आधीचा एक आठवडा 'मेकिंग ऑफ गणपती ' चा असायचा . आई बाबांसोबत पायी पायी फिरायला निघायचो . बोरभाट लेन मधून मुगभाटात . तिथे आईच्या मैत्रिणीच्या - शोभा मावशीच्या - कुटुंबाचा गणपती बनवण्याचा कारखाना होता . तिथे उभे राहून गणपतीची विविध रूपं साकारताना पाहणं हा एक अवर्णनीय अनुभव असायचा. मुगभाटात असे बरेच कारखाने होते. सगळीकडे थोडा थोडा वेळ थांबून  मग आमची यात्रा जायची जितेकर वाडीकडे . इथे मोठ्या मुर्ती बनवत असत . आज गिरगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला 'निकदवरी  लेन ' चा गणपती तर अगदी जवळचा . तिथल्या सारस्वत बँकेला लागून त्याचा मंडप असायचा . आणि बँकेच्या वरती पहिल्या मजल्यावर आमचा नृत्याचा क्लास . मग रोज आम्ही हळूच मंडपाची कमान उचलून मूर्तीचं काम कुठवर आलंय ते पाहायचो . जगातल्या कुठल्याही प्रोजेक्ट सारखं त्यांचंही काम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत चालूच असायचं .
मग गणपतीच्या आगमनाची चाहूल लागायची. घराखालच्या भांड्यांच्या दुकानात तबक , पळी -पंचपात्र , समया आता पुढचं स्थान पटकवायच्या . आणि त्यांसोबत पितळेच्या झान्जा ही .
घरी गणपती बसत नसे , पण आजुबाजुच्या कडचे सर्व गणपती आपलेच वाटत . पेठे बिल्डिंग मधल्या शिर्के काकांच्या घरचा दीड दिवसाचा गणपती जणू आमचाच . मुर्ती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही तिकडेच असायचो.  सर्वात छान वाटायचं ते संध्याकाळच्या आरतीच्या वेळी . 'सुखकर्ता दुःखहर्ता ' ते 'ओम यज्ञेन  ...' ह्या मंत्र पुष्पांजली पर्यंत सर्व आरत्या कधीही पाठांतर न करता , पुस्तक न पाहता आपसूक म्हणता येतात त्या याच दिवसांमुळे .
सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी आमची फिरस्ती असायची मानाचे गणपती पाहायला .  निकदवरी लेन , मुगभाट , सूर्य महाल , खाडीलकर रोड भाजी गल्ली आणि के. ना.  म्हणजे केशवजी नाईक वाडी या ठिकाणी आवर्जून जाणं व्हायचं . आणि बाकीही वाटेत असणाऱ्या सर्व वाड्यांचे . खेतवाडीच्या सर्व गल्यांचे फारच सुंदर असायचे , मूर्ती  आणि देखावे दोन्ही .
नंतर यायच्या गौराई . कोळीवाडीतल्या  'कोळ्यांची गौर ' पाहायला न चुकता जायचो . जरीच्या साडीत आणि गळाभर दागिन्यांनी सजलेली प्रसन्न गौराई पाहताना हात आपोआप जोडले जायचे.
या सर्व धामधुमीत दहा दिवस कसे भुर्र्कन उडायचे ते कळायचंच नाही , आणि मग यायची अनंत चतुर्दशी .
दीड दिवसाच्या विसर्जनाला आम्ही चौपाटीवर जायचो . बाप्पाची अखेरची आरती करताना खरंच आवंढा यायचा आणि मनापासून म्हणायचो  - 'पुढच्या वर्षी लवकर या '.
अनंत चतुर्दशी ला मात्र गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी  त्यामुळे क्वचितच जाणं व्हायचं . पण आमचं घर गिरगावच्या मुख्य रस्त्यावर असल्याने जवळ जवळ सर्वच विसर्जन मिरवणुका तिथूनच जायच्या .
संध्याकाळी चार वाजल्या पासूनच आमचा मुक्काम खालीच . रामजीचं plywood  च दुकान त्या दिवशी बंद असायचं . त्यामुळे तिथे जागा धरून बसलो की सर्व गणपती आणि मिरवणुका पाहायला मिळायच्या .
ढोल ताश्यांचा इतका आवाज असायचा की ओरडून बोलल्याशिवाय बाजुच्याच बोलणंही ऐकायला यायचं नाही .
लांब लांबचे गणपती पहायला मिळायचे . लालबागचा राजा पहायला मात्र ऑपेरा हाऊसलाच जात असू . सकाळी लालबाग वरून निघालेली राजाची मिरवणूक ऑपेरा हाऊस जवळ यायला रात्रीचे ११-१२ वाजायचे. तो पाहून परत घरी येईपर्यंत झोप अगदी अनावर व्हायची . ढोल - लेझीम च्या गदारोळात , बाप्पाची विविध रूपं आठवत निद्रादेवी कधी प्रसन्न व्हायची ते कळायचंच नाही.

Wednesday, January 24, 2018

काही सहज लक्षात आलेली गिरगावातली अजब-गजब eating joints नावं

काही सहज लक्षात आलेली  गिरगावातली अजब-गजब  eating joints नावं -

आमच्या गिरगावात खाद्य भ्रमंती साठी भरपूर ठिकाणं होती  आणि अजूनही आहेत . तेव्हा ही  सगळी दुकानं  त्यांच्या shortform नावांनी ओळखली जायची , पण पूर्ण नावं खरंच गमतीशीर होती .
बहुतांशी दुकानांची नाव त्यांच्या मालक/चालक मंडळींच्यां नाव /आडनावा नुसार असायची.   पण नावामागे  त्यांनी लावलेले extensions एकदम innovative  होते .

- गोविंदाश्रम  - काय वाटतं नाव वाचून?  भजन प्रवचन चाललंय असं वाटतं ना? पण हे नाव होत एका मस्त छोट्याश्या हॉटेल च . माझ्या आयुष्यातलं पाहिलं बर्गर मी इथे खाल्लंय . मिसळ उसळ बटाटावडा  खाण्यासाठी एक cool जागा  .
- पणशीकर 'आहार गृह' - फराळी मिसळ आणि इतर फराळी पदार्थांसाठी फेमस. तसेच मिठाई , दूधी वडी , आंबा वडी पण फेमस।
- प्रकाश  'दुग्ध मंदीर ' - V .P  रोड वर ह्यांची २ दुकान होती. आंग्रे वाडीच्या नाक्यावर असलेलं हे अगदी छोटंसं दुकान . इथला साबुदाणा वडा  माझ्यासाठी baseline आहे , दुसरीकडचा वडा प्रकाश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे हीच तुलना . आणि त्यांचा पियुष  ... उफ्फ , बेस्ट बेस्ट बेस्ट !!!
- विनय 'हेल्थ होम '  - नंबर १ मिसळ,  आणि अनेक खास मराठी dishes. माझ्या classmate आशीष च्या मामांचं हे हॉटेल .
- छत्रे 'कोल्हापुरी चिवडा ' - मंगल वाडी समोर असणारं एक मिठाई  आणि उपहार गृह .  नावात चिवडा असला तरी actually मी इकडचा चिवडा कधीच नाही खाल्ला. पण डाळिंबी उसळ , मिसळ , कोथिंबीर वडी  एकदम मस्त .
'कुटुंब सखी ' - नावानुसार हे केंद्र स्त्रिया चालवायच्या . जपानी बागेत (नंतर स. का. पाटील  उद्यान ) मध्ये हे कॅन्टीन सारखं होत . बटाटा वडा , पोहे झकास आणि गरमा गरम मिळायचे.
- क्षुधा शांती भवन  - name says it all. घरगुती खाणावळी सारखं जेवण मिळण्याचं ठाकूरद्वार जवळच ठिकाण.
- अनंताश्रम  -  नाव आश्रम असलं तरी हे नाव होत खोताच्या वाडीतली ,अप्रतिम मासे आणि मटण मिळणाऱ्या ठिकाणाचं .  fresh  मासे आणि अतिशय अप्रतिम चवीची fish curry हि इकडची खासियत . मला वाटतं आता हे बंद झालंय .
- माने 'कोल्डड्रिंक हाऊस ' - बोरभाट लेन च्या नाक्यावर होत, इथे फक्त थंड पेय मिळायची . नंतर चहा पण मिळत होता बहुतेक.  जिंजर लेमन , लिंबू सोडा , शिकंजी सरबत आणि bottled कोल्ड-ड्रिंक मिळणारं दुकान .
- 'दरयुश' बेकरी  - सेंट्रल  सिनेमा समोर. दरयुश हे मालकाचं नाव होत का हे माहित नाही पण इथले केक , biscuits खूप छान असायची .
- राजा 'रिफ्रेशमेंट ' - मॅजेस्टिक सिनेमा जवळ असणारं ऑल-इन-वन हॉटेल जिथे मिसळ, वड्यासोबत डोसा, इडली पण छान मिळायचे

हि काही सहज म्हणून आठवलेली नाव आणि ठिकाणं . अजूनही कित्येक अशी नाव आहेत आणि जागा पण . त्यांच्याविषयी पुन्हा केव्हातरी .