Showing posts with label personal. Show all posts
Showing posts with label personal. Show all posts

Monday, May 8, 2023

आम्ही मुंबईकर


आम्ही मुंबईकर कारण  - 

* 'अ ' ठिकाणाहून  'ब' ठिकाणाचं अंतर किती आहे हे आम्ही मिनिटं -तासात मोजतो , किलो मीटर मध्ये नाही 

* ५-१७, ८-४२, ७-२४ ह्या वेळा कशाच्या आहेत हे कळायला आम्हाला अजून काही स्पष्टीकरणाची गरज नाही 

* वडा - पाव ही आमची अत्यंत आवडती डीश आहे आणि तो नाश्ता , दुपारचं जेवण किंवा 'असच काहीतरी ' ह्या सर्व कारणांसाठी खाऊ शकतो 

* संकट काळी आम्हाला सिद्धी विनायक , हाजी अली  आणि माउंट मेरी ची एकत्र आठवण येते 

* मुंबई च्या वरचे सगळे ;नॉर्थ इंडियन ' आणि खालचे सर्व  'मद्रासी ' हे आमचं अर्वाचीन मत आहे 

* जगातली सर्वात शांत, आत्म परीक्षण करायची  जागा म्हणजे मरीन ड्राईव्ह चा गजबजलेला कट्टा 

* मुंबई च्या स्वतःच्या अशा खास भाषेत - ज्यात बॉस , घंटा , निकल ले , जुगाड, मांडवली  असे विविध अद्वितीय शब्द आहेत - आम्ही पारंगत आहोत 

* आयुष्यातील नकार पचवायची दैवी शक्ती  आणि मनोबल वृद्धिंगत करण्यात इथल्या रिक्षा वाल्यांचा मोठा हातभार आहे 

* जगात कुठेही असो , 'गणपती बाप्पा ' ची आरोळी कानावर पडली की लगेच  'मोरया ' असा जयघोष मनात उठतोच 

* एकदा तरी 'ताज ' मध्ये जेवायला नाही तर किमान चहा प्यायला  तरी जायचं हे आमचं बालपणाचं स्वप्न असतंच 



Monday, April 26, 2021

वाढदिवस आणि बाबा

काल रात्री १२ वाजता लेकाने गळ्यात पडून Happy Birthday विश केलं आणि खर्र्कन जाणवलं की ह्या वर्षी मला विश करायला बाबा नाहीत . 

माझा वाढदिवस म्हणजे अगदी खास त्यांच्या साठी . एकही वर्ष असं गेलं नाही कि मला बाबांनी विश  करून काही भेट दिली नसेल 

मी शाळेत असताना वाढदिवस जसजसा जवळ येई तसे बाबा गिरगावातल्या खास खास कपड्यांच्या दुकानाच्या फेऱ्या मारायचे . आणि शॉर्टलिस्ट करायचे की ह्या वर्षी मला काय घेणार ते 

अगदी लहानपणी च नाही आठवत पण कळत्या वयातले त्यांनी घेतलेले सगळे ड्रेस मला अजूनही आठवतात . त्यांची पसंद मला आवडली नाही असही  कधी झालं नाही . 

एका वर्षी 'गोट्या ' नावाची मालिका खुप प्रसिद्ध झाली होती आणि आम्ही सर्व पाहायचो TV वर . त्या वर्षी त्यांनी मला गोट्या कादंबरी चा पूर्ण सेटच आणला होता . 

एकदा मला प्रार्थना समाज च्या एका बूकडेपो मध्ये घेऊन गेले आणि म्हणाले तुला हवी ती पुस्तक घे , मी गोंधळून १-२ छोटी छोटी पुस्तकं घेतली , मग त्यांनीच अजून ४-५ सिलेक्ट केली आणि आम्ही रमत गमत (मी उड्या मारत ) घरी आलो . 

माझं लग्न झाल्यावर देखील हा सिलसिला चालूच राहिला . एप्रिल च्या सुरवाती पासूनच ते आई ला विचारायला लागायचे काही आणलास का नाही अजून तिच्या साठी ?

जेव्हा ते स्वतः बाहेर जायचे तेव्हा काही नाही तेर ग्रांट रोड च्या मेरवान चे मावा केक तर आवर्जून आणायचे . २४ ला सकाळी सकाळी फोन यायचा शुभेच्छा द्यायला . 

गेल्या एक-दीड वर्षात त्यांचा तारखा बाबत जरा गोंधळ व्हायचा . कुठला महिना चालू आहे हे पटकन उमगत नसे. मी गेल्या ७ फेब ला त्यांना भेटायला गेले होते, तेव्हा निघताना त्यांनी विचारलं कि २४ तारखेला येशील ना तू?  मला पटकन समजलं नाही असं का विचारतायत , मी म्हटलं काय आहे बाबा ह्या २४ ला ? तर त्यांच्या खास शैलीत म्हणाले "अरे येडा , तुझा वाढदिवस नाही का ? " इतकी महत्वाची होती २४ तारीख त्यांच्या साठी . 

आता बाबांना जाऊन २ महिने झाले , ह्याच नाही तर ह्या पुढच्या प्रत्येक वाढदिवसाला मला तुमची उणीव भासणार आहे बाबा . तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम पाठीशी राहूद्या . 


Wednesday, April 25, 2018

मास्टर शेफ - My View

आमच्या घरात मोठी आणि छोटी मंडळी  food-lovers असल्यामुळे मास्टर - शेफ series अनेकदा पाहिली जाते. आणि  दर वेळी मला प्रकर्षाने जाणवतं की 'This is not fair'

एखाद्या पाककृतीची चव तसेच रंग-रूप आवडणं किंवा न आवडणं हा अतिशय वैयक्तिक चॉईस आहे हे माझं ठाम मत आहे .
कितीतरी उदाहरणं देता येतील की  शिजवलेला पदार्थ त्यातील घटकांमुळे , किंवा बनवण्याच्या पद्धतीमुळे , एखाद्याला फार आवडून जातो आणि एखाद्याला नाक मुरडायला भाग  पाडतो . 

माझ्या बहुतेक पदार्थांमध्ये सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचा सढळ हाताने वापर असतो , पण कित्येक परिचित बंगाली /ओडिसी मंडळींना हे खोबऱ्याचं preparation अजिबात आवडत नाही .
माझे आई -बाबा केवळ दही -दूध -ताक यावर दिवस च्या दिवस काढू शकतील आणि मला दुग्धजन्य पदार्थ जरा पण आवडत नाहीत .
कुरकुरीत तळलेली  मांदेली खुप आवडते पण कलेजी फ्राय ला हात पण लावत नाही .

कुणाकडे भाजीत १ मिरची पण खूप होते तर कुणाकडे भाजीत मूठभर मिरच्या असल्या शिवाय ती भाजी खाल्ल्यासारखी वाटत नाही.
अजुन टिपिकल उदाहरण द्यायचं तर ice -cream च देईन . जेव्हा जेव्हा Natural च्या दुकानात जातो , तेव्हा तेव्हा 'व्यक्ती तितक्या प्रकृती ' हे अगदी ठळक पणे जाणवतं. 
मुलाचं ठराविक चॉकलेट फ्लेवर , आम्हा दोघांचं   seasonal fruit फ्लेवर , बाकी सर्वांचं टेंडर कोकोनट किंवा सिताफळ.

फक्त चवच नाही तर feel /  texture  च्या बाबतीत पण आवडी -निवडी भिन्न असतात .
साधा भात , पण एकाच घरात एकाला अगदी मऊ शिजलेला आवडतो तर दुसऱ्याला शीत आणि शीत मोकळा असलेला आवडतो .
माझा मुलगा रश्यामधलं चिकन खात नाही पण कबाब किंवा बिर्याणी मधलं चिकन मनापासून खातो.
कुणाला डोसा पापडासारखा कुरकुरीत आवडतो तर कुणाला मऊसूत आवडतो .
कुणाला भात सुकाच खायला आवडतो तर कुणाला भातावर दुप्पट प्रमाणात डाळ -रस्सा लागतो तर कुणाला अगदी बेतास बेत प्रमाणात .
अंड - कुणाला उकडून आवडतं तर कुणाला half फ्राय , कुणाला मसाला ऑम्लेट तर कुणाला scrambled .

तात्पर्य काय तर हेच की पदार्थांची चव आणि सादरीकरण ही अगदी अगदी वैयक्तिक बाब आहे , आणि एकाला तो पदार्थ भावला तर तो best झालाय आणि नाही आवडला तर बेकार झालाय - हे ठरवणं तितकंसं बरोबर वाटत नाही.
मान्य आहे की काही पाककृतींची  standard procedure आणि ठराविक ingredients असतात , पण शेवटी  टेस्ट buds प्रत्येकाचे वेगळे असतात ना

मला जर कोणी पाककला स्पर्धेची परीक्षक म्हणून बोलावलं तर मी ठरवूच शकणार नाही की कोणाची डीश बेस्ट झालीय (म्हणजे अगदीच एखादी गंडली असेल तर गोष्ट वेगळी )
एकतर मला बनवायचे नाहीयेत ते complex  पदार्थ आणि वरतून ३-४ लोक मेहनत  करून मला खिलवतायत म्हणजे सोनेपे सुहागा
अश्या वेळी , समोर आलेल्या पदार्थावर ताव मारायचं सोडून त्याला critique करायचं म्हणजे महाकठीण

असो .. ज्यांना वेगवेगळ्या पाककृती चाखायला , बघायला आणि करून पाहायला आवडतात त्यांना मास्टर शेफ नक्कीच आवडत असेल (मला पण आवडेल पण फक्त तो परीक्षेचा  भाग नसेल तर  :) )